दि.१५ (संदिप बैसाणे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज परिवर्तनाच्या लढ्याला त्यांच्यानंतर योग्य दिशेने घेऊन जाण्याचे कार्य मा. कांशीराम जी यांनी केले. त्यांचे हे मिशन पुढे कोण नेईल, असा प्रश्न त्यांच्या आजच्या जयंतीनिमित्त माझ्या मनात सहज आला. हा प्रश्न मनात घोंगावत असताना थेट लख्ख प्रकाश पडावा अगदी तशी ही प्रतिमा मला ऑनलाईन मिळाली. प्रतिमा पाहताच मला जणू उत्तर गवसल्यासारखे झाले; हो समाज परिवर्तनाचा हा लढा भारताच्या रस्त्यांना पायाखाली घालित सामान्य माणसाचे प्रश्न आणि सुखदुःख जाणून घेत निधड्या छातीने आधी 'भारत जोडो यात्रा' आणि आता 'भारत न्याय यात्रा' करणारे राहुल गांधी भारताच्या समाज परिवर्तनाचा लढा पुढे नेतील याचा माझ्या मनात विश्वास निर्माण झाला. केंब्रिज विद्यापीठात भारतीय भूमीत निर्माण झालेल्या बौध्द तत्वज्ञानावर उच्चविद्या विभूषित राहुल गांधी यांना परवा सहजच त्यांच्या यात्रे दरम्यान भेटून हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली. भारदस्त आणि उंच देह, कडक उन्हात तापूनही निखळ चमकणारा गौरवर्ण आणि भारतीय माणसाला प्रेमाने जिंकण्याचा कमालीचा आत्मविश्वास. गेली वीस वर्षे खासदार असूनही अहंकारशून्य असणारं व्यक्तीमत्व. २००४ ते २०१४ याकाळात त्यांनी ठरवले असते तर पंतप्रधान बनले असते. परंतु, सत्तेची घाई नसलेला हा धिरोदात्त नेता आता मात्र लोकनायक-जननायक बनून लोकांना धिर देत आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या दोन यात्रा दरम्यान खरा भारत पाहिला. अन् त्यांना वास्तव कळले की, या देशातील एससी, एसटी, ओबीसी मायनॉरिटी, शेतकरी, महिला आणि बेरोजगार युवक हे फारच हलाखीचे जीवन जगत आहेत. राजकीय सत्तेत बदल नेमका कशासाठी करायचा, याचे नेमके कारण त्यांना सापडले. संपूर्ण उत्तर प्रदेश च्या दौऱ्यात त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, या देशाच्या प्रशासनात एससी एसटी ओबीसी यांना न्याय्य प्रतिनिधित्व आहे काय? या देशाचे काॅर्पोरेट उद्योजक देशाच्या सार्वजनिक संपत्तीची लूट करित असताना एससी, एसटी, ओबीसी यांना रोजगार देत नाहीत. जातीनिहाय जनगणना या देशात झालीच पाहिजे, याची उच्चरवाने भूमिका घेणारे राहुल गांधी ' जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी ' या भूमिकेपर्यंत आलें आहेत. सामाजिक न्याय, रोजगार ,प्रेम, बंधुता आणि समता या तत्त्वमूल्यांना घेऊन हा तरूण राजकीय नेता या देशाचा भावी पंतप्रधान आहे. त्यांच्याशी हस्तांदोलन करून मला त्यांच्या समतेच्या विचारांच वाहक होता आलं, यात मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे ही प्रतिमा आज मान्यवर कांशीराम जी यांच्या जयंतीदिनी मिळाली; यातून हा संदेश मिळतो की, 'समाज परिवर्तन का यह कारवां' अब सक्षम नेतृत्व लेकर जा रहा है !
byloksahi.varta.news
-
0